Thursday, November 24, 2011


……………… राहिले 

माझी व्यथा मी कुणालाच सांगितली नाही
मी कधीच कुणाची मदत मागितली नाही
आतल्या आत होरपळतच राहिले 

मला समजुन घेण्यासाठी बरीच मने जवळ आली 
पण मी माझे मन हलके केले नाही 
माझी दु:ख मी कुरवाळतच राहिले 

जो जवळ यावा असे वाटले तो आलाच नाही 
कदाचित तो माझा कधी झालाच नाही 
मी उगाचच भरकटत राहिले 

अश्रुंना वाट मी सापडूच दिली नाही 
त्यांनी अटोकाठ प्रयत्न केला पण 
मी त्यांना ही फसवतच राहिले 

मन माझे तसे अगदी स्वच्छंदी 
पण मी त्याला चौकटीत बांधून ठेवले 
उगाच नको ते नियम पाळतच राहिले

आता ठरवले आहे वर्तमानात जगायचे 
दर दिवशी एक नविन स्वप्न बघायचे 
आज जाणवतय मागे बरेच कIही राहिले

Friday, June 24, 2011

ओलावाओला ढग, ओला पाऊस ओलाच थेंब 
मी ही ओला अन ती ही ओली चिंब  
ओली पाने, ओले पक्षी ओलीच माती
मी तिच्या मिठीत आणि माझ्या ती
ओले मन, ओले विचार आणि ओलेच प्रेम
ओल्या सरी ओघळण्यासाठी अंतर जेमतेम
ओला डोंगर ओला समुद्र ओलेच आकाश
ओले ओठ ओले गाणे ओलाच श्वास
ओला दिवस ओला सहवास ओलीच सांज  
ओले डोळे ओले आसू विरह ही ओलाच
ओली गर्दी ओला प्रवास ओलाच विलंब
ओल्या घरी पोहोचायला ओलीच सबब
ओला ओरडा अन आईच्या काळजीचा ओलावा 
मी भिजले नसल्याचा ओलाच दिखावा
भिजलेले कपडे सुखतीलही
पण विसरू कशी तुझी ओली आठवण?
म्हणूनच पुन्हा ओले होण्यासाठी
देते पावसाला उद्याचे ओले निमंत्रण

Sunday, June 19, 2011

ते हळुवार दिवस

शाळेचे दिवस म्हणजे मोरपिसासारखे
हळुवार जपलेले आजही मनाच्या वहीत
घट्ट मैत्रीच्या खाल्लेल्या शपथा आणि
उगीचच अबोला धरलेल्या क्षणांच्या सहित

शाळा सुटली आणि पाटी फुटली
सापडेनासे झाले रंगबिरंगी खडू
कंठ फुटला अन मिशा देखील
मिळू लागले जगण्याचे बाळकडू

Monday, May 30, 2011

बाळा
बाळा तु येणार ही बातमीच गोड
तुझ्या येण्याची सर्वांनाच ओढ
तुझ्या आईचे जीवनच सार्थ
तुझ्या बाबाच्या जगण्याला अर्थ
आजीची जुन्या कपड्यांची जुळवाजुळव
आजोबांना स्वप्नात तु पळव
पुतण्याच्या येण्याने मन भरलेलं काकाचं
आत्तुला छळायला येईल कुणी हक्काचं
मामाच्या गावाला कुणी जाणारं
मावशीचा पापा कुणी घेणारं

तुझे आमच्या आयुष्यात येणे अविस्मरणीय
तुझा तो पहिला वहिला स्पर्श स्वर्गीय
इवलेसे हात अन् चिटुकले पाय
पापण्यांच्या लुकलुकण्यात मन हरवून जाय

तुझे रडणेही आम्हा वाटे रे आलाप
वेळेचे नाही भान, हरवलो आपोआप
हाताचा झुला करू वा मांडीचा बिछाना
पण तुला नाही बघवत आम्हा रडताना

तुला कुशीत घेण्यात एक आगळाच आनंद
ह्रदयाची धडधड कशी ऐकू येई मंद
पण तुझा मात्र गोष्ट सांगण्याचा हट्ट
भीती तुला वाटताच मिठी होई घट्ट

दिवसभराच्या दगदगीनंतर थकूनभागून आल्यावर
शीण सारा पळून जाई बाळा तुला पाहिल्यावर
धावत येशी आम्हापाशी हात पुढे तु करून
उचलून घेता तुला जाई उर आनंदाने भरून

खेळताना तु वाटे पावलोपावली धोका
पडताना पाहून चुके काळजाचा ठोका
खेळताना तुला न राही कशाचेच भान
तुला स्वच्छंद हसताना पाहून आम्हा वाटे छान

बघता बघता शिकलास कधी आमचेच शब्द
उजळणी होता त्यांची होऊन जातो निशब्द
कधीकधी बोलतोस तु असं काही पटकन
कौतुकाने डोळ्यामध्ये बाळा पाणी दाटे टचकन

आम्ही न केलेली हौसमौज तुझ्यात रे पाहू
तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र राबू
आयुष्याचा ठेवा म्हणजे तुझ्या आठवणींची साठवण
राहिल ना रे तुला तुझ्या आईबाबांची आठवण?

Wednesday, January 27, 2010

अश्रू


दु:ख तसे प्रत्येकाच्याच नशिबी
असते देवाने लिहिलेले
काही लोकांना चिमुठभर
तर काहींना मुठभर वाटलेले

दु:ख तसे लहान मोठे
येत नाही हाताने मोजता
हातांना येते ते फक्त
दुसऱ्यांचे अश्रू पुसता

अश्रू म्हणजे दु:खाची पावती
पापण्यांचा उंबरठा ओलांडल्यावर
गालावरून सरसर ओघळती
पुसण्यास जर नसले हात सांत्वनाचे
तर धरतीमातेला जाऊन मिळती

काही अश्रू करतात फक्त
डोळ्यात निर्माण ओलावा
पापण्यांच्या चिरेबंदी वाड्यात
असे त्यांचा विसावा

आयुष्य एखाद्याचे संपल्यावर
अश्रूंची धार बरसते
ठाव नसते त्यांना बरसल्यावर
की त्यांचेही आयुष्य संपते

अश्रूंना न रंग असतो
ना असतो त्यांना गंध
स्वत: ढळून दुसऱ्याचे
मन मोकळे करण्याचा छंद

अश्रू असतात सदा अबोल
त्यांचा किंचितही न होई आवाज
मेलेल्या सुखाच्या तिरडीवरती
त्यांच्या फुलांचा निशब्द साज

अश्रुंचे अनुशासन कमालीचे
त्यांचे ढळणे देखील एका रांगेत
उतरताना आपल्या गालावरुनी
देतात दु:ख संपल्याचा संकेत

प्रेम असफल झाल्यावरही
लावतात अश्रू हजेरी
पण सांगा मला या अश्रूंनी
प्रेम करावे कोणावरी

अश्रूंची ताकद निराळीच
आगळीच त्यांची कर्तव्य
दु:ख हलके करण्याचे
त्यांच्यात विलक्षण सामर्थ्य

नसतेच अश्रू जर आपल्यापाशी
तर काय होते गत्यंतर
नसते कळले आपल्याला
सुख दु:खातले अंतर

नसते अश्रू जर आपल्यापाशी
तर नसती झाली सुखाची जाणीव
पण असलेल्या गोष्टींची का कधी
भासली आहे मानवाला उणीव

इतकी वर्ष जगुनही मानवाला
कळला न जन्म - मृत्यूचा अर्थ
जन्मताच होतो मृत्यू अश्रूंचा
पण त्यांचे मारणे ही ठरते सार्थ

कुणी म्हणती अश्रू यांना
कुणी म्हणती डोळ्यातील पाणी
आसू म्हणती, आसवे म्हणती
कुणी म्हणती यांना रडगाणी

कुणी म्हणो काहीही पण
अश्रू अनमोल असतात
सगळे काही स्वत: सांगूनही
दुसऱ्यांसाठी अबोल असतात

आनंदातही हजेरी लावण्यास
येतात बऱ्याचदा अश्रू
दु:खात आणि विरहात
येतात सदानकदा अश्रू
जगात येताना आपले अश्रू
आणि आपण गेल्यावर जगाचे अश्रू

तेव्हा अश्रूंना पर्याय नाही
ते अजरामर आहेत
तुमच्या आमच्यातच नव्हे
तर ते जगभर आहेत

Wednesday, November 11, 2009


मरणावर बोलू काही?

आयुष्यावर सगळेच बोलतात
दुखाःत बुडतात, आनंदात मोहरतात
पण मरणाचा विषय काढल्यावर
भलेभले देखील घाबरातात


आयुष्यावर साहजिकच जास्त बोलू शकतो
कारण आयुष्याचे आयुष्य मोठे असते
मरणाचा कालावधी तो किती
काळ अन् वेळेची सांगड ती


ब-याच वेळा काळ आलेला असतो पण
वेळेची वेळ झालेली नसते
एरवी सदैव तत्पर असलेल्या यमाच्या
कामात देखील हयगय झालेली असते


आयुष्य हे सर्वतोपरी उपभोगायचे
मरणापूर्वी मात्र भोग भोगायचे
आयुष्याला गरजेची असते ती कामना
मृत्यूला असतात केवळ मरण यातना


आयुष्याला लाभतात ते सुखदुखाःचे क्षण
मरणाची असते ती अंतिम घटिका
आयुष्याचे असते ते तीन अंकी नाटक
मरणाची केवळ लघु एकांकिका


आयुष्याचा शेवट होतो तो मरणाने
ह्या नाहीतर त्या कारणाने
माणूस जगात येतो तो जन्माने
पण ओळखला जातो आपापल्या कर्माने


अनेकांच्या आयुष्यात असेही येतात क्षण
कंटाळून आयुष्याला देवाला मागतात मरण
इथे कळतो जगण्याचा खरा अर्थ
जिथे आयुष्यही जाते मरणाला शरण


आयुष्यभर खरे खोटे बोलल्यावर कळ्ते की
मॄत्यु हे अंतिम सत्य आहे
तुम्हा आम्हांला नवीन असेल
पण यमाला मात्र हे नित्य आहे


जगण्यासाठी करतो आपण दरदिवशी
क्षणोक्षणी एक जीवघेणी धडपड
मेल्यानंतर मात्र केवळ लागते
बांबूची तिरडी अन् पांढरे कापड


जगताना कळत नकळत कुणाकुणावर ओझे टाकतो
मेल्यावर तुमचे ओझे उचलतात ते खांदेकरी
मरणोपरांत तुमच्या आत्म्याला मिळालेल्या
सदगतीचे हेच खरे मानकरी


आयुष्याचा मानवाला लाभलेला अवधी
कुणाचा मोठा तर कुणाचा बारका
जगता जरी आले न एकसारखे
तरी अंत्यविधी मात्र सा-यांचा एकसारखा


लपाछुपीचा खेळ खेळावा असं हे
जीवन मरणाचं क्षणभंगूर नातं
आयुष्यभर नावापुढे लावलेले श्री
क्षणात कैलासवासी होऊन जातं


जगणे हे जर एक प्रवास असेल तर
मरण हे म्हणजे मुक्कामाचे ठिकाण
जगणे हे जर एक शिखर असेल तर
मरण म्हणजे फडकवण्याचे निशाण

शपथविधी झाला

शपथविधी झाला

मतदानाचा हक्क बजावला
निवडणुकीचे निकाल लागले
तेच सरकार निवडून देऊन
जनतेचे पुन्हा बारा वाजले

स्पष्ट मिळाले बहुमत
पण होऊ न शकले एकमत
गृहीत धरलेले लोकमत
किंवा मताची मोजलेली किंमत

सर्वा हवी होती खाती
जेथून पैसे खाता येती
हवालदिल झालेला शेतकरी
अन त्याची गहाण ठेवलेली माती

महाग झालेली साखर तुरडाळ
पाडती खिशाला मोठी भोकं
मटण मच्छी दूर राहिले
भाजीपाल्याने देखील गाठले टोकं

घरोघरी ऑफिस मध्ये
जनमाणसात आहे एकच चर्चा
सांगा राज्यकर्त्यांनो आम्ही
कशा पुऱ्या कराव्या गरजा?

स्वस्त काही राहिले असेल तर
त्या राजकारण्यांच्या शपथा
हे करू अन ते करू म्हणणारे
होती ५ वर्षांकरिता लापत्ता

मतदाराला थोडी अक्कल, थोडा वेळ
अन कळतो थोडासाच कायदा
ह्या अशाच फक्त शिकलेल्या जनतेचा
घेती अडाणी मंत्री गैरफायदा

अमुक पक्ष असो वा तमुक मंत्री
सर्वांचे एकच सर्वव्यापी धोरण
भुकेने जनता मेली तरी चालेल
पण आपल्या दारी लावू सोन्याचे तोरण

तांदळातून खडे निवडायला वेळ लागावा
त्याहूनही कमी वेळात निवडतो आपण उमेदवार
जसा खडा काढावा भातातून
तसाच उमेदवार बाद करण्याचा असावा अधिकार

करंगळी कापून ह्यांचा व्हायला हवा शपथविधी
म्हणजे राहील ह्यांना वचनांची आठवण
तरीदेखील विसर पडला ह्यांना
तर करू ताबडतोब ह्यांची घरी पाठवण

असे केल्यानेच येईल शिवबांचे राज्य
रयतेच्या दारात लागेल आनंदाची दीपमाला
आणि तुम्हा आम्हाला म्हणता येईल
खर्या अर्थाने शपथविधी झाला