Wednesday, January 27, 2010

अश्रू


दु:ख तसे प्रत्येकाच्याच नशिबी
असते देवाने लिहिलेले
काही लोकांना चिमुठभर
तर काहींना मुठभर वाटलेले

दु:ख तसे लहान मोठे
येत नाही हाताने मोजता
हातांना येते ते फक्त
दुसऱ्यांचे अश्रू पुसता

अश्रू म्हणजे दु:खाची पावती
पापण्यांचा उंबरठा ओलांडल्यावर
गालावरून सरसर ओघळती
पुसण्यास जर नसले हात सांत्वनाचे
तर धरतीमातेला जाऊन मिळती

काही अश्रू करतात फक्त
डोळ्यात निर्माण ओलावा
पापण्यांच्या चिरेबंदी वाड्यात
असे त्यांचा विसावा

आयुष्य एखाद्याचे संपल्यावर
अश्रूंची धार बरसते
ठाव नसते त्यांना बरसल्यावर
की त्यांचेही आयुष्य संपते

अश्रूंना न रंग असतो
ना असतो त्यांना गंध
स्वत: ढळून दुसऱ्याचे
मन मोकळे करण्याचा छंद

अश्रू असतात सदा अबोल
त्यांचा किंचितही न होई आवाज
मेलेल्या सुखाच्या तिरडीवरती
त्यांच्या फुलांचा निशब्द साज

अश्रुंचे अनुशासन कमालीचे
त्यांचे ढळणे देखील एका रांगेत
उतरताना आपल्या गालावरुनी
देतात दु:ख संपल्याचा संकेत

प्रेम असफल झाल्यावरही
लावतात अश्रू हजेरी
पण सांगा मला या अश्रूंनी
प्रेम करावे कोणावरी

अश्रूंची ताकद निराळीच
आगळीच त्यांची कर्तव्य
दु:ख हलके करण्याचे
त्यांच्यात विलक्षण सामर्थ्य

नसतेच अश्रू जर आपल्यापाशी
तर काय होते गत्यंतर
नसते कळले आपल्याला
सुख दु:खातले अंतर

नसते अश्रू जर आपल्यापाशी
तर नसती झाली सुखाची जाणीव
पण असलेल्या गोष्टींची का कधी
भासली आहे मानवाला उणीव

इतकी वर्ष जगुनही मानवाला
कळला न जन्म - मृत्यूचा अर्थ
जन्मताच होतो मृत्यू अश्रूंचा
पण त्यांचे मारणे ही ठरते सार्थ

कुणी म्हणती अश्रू यांना
कुणी म्हणती डोळ्यातील पाणी
आसू म्हणती, आसवे म्हणती
कुणी म्हणती यांना रडगाणी

कुणी म्हणो काहीही पण
अश्रू अनमोल असतात
सगळे काही स्वत: सांगूनही
दुसऱ्यांसाठी अबोल असतात

आनंदातही हजेरी लावण्यास
येतात बऱ्याचदा अश्रू
दु:खात आणि विरहात
येतात सदानकदा अश्रू
जगात येताना आपले अश्रू
आणि आपण गेल्यावर जगाचे अश्रू

तेव्हा अश्रूंना पर्याय नाही
ते अजरामर आहेत
तुमच्या आमच्यातच नव्हे
तर ते जगभर आहेत