Monday, May 30, 2011

बाळा








बाळा तु येणार ही बातमीच गोड
तुझ्या येण्याची सर्वांनाच ओढ
तुझ्या आईचे जीवनच सार्थ
तुझ्या बाबाच्या जगण्याला अर्थ
आजीची जुन्या कपड्यांची जुळवाजुळव
आजोबांना स्वप्नात तु पळव
पुतण्याच्या येण्याने मन भरलेलं काकाचं
आत्तुला छळायला येईल कुणी हक्काचं
मामाच्या गावाला कुणी जाणारं
मावशीचा पापा कुणी घेणारं

तुझे आमच्या आयुष्यात येणे अविस्मरणीय
तुझा तो पहिला वहिला स्पर्श स्वर्गीय
इवलेसे हात अन् चिटुकले पाय
पापण्यांच्या लुकलुकण्यात मन हरवून जाय

तुझे रडणेही आम्हा वाटे रे आलाप
वेळेचे नाही भान, हरवलो आपोआप
हाताचा झुला करू वा मांडीचा बिछाना
पण तुला नाही बघवत आम्हा रडताना

तुला कुशीत घेण्यात एक आगळाच आनंद
ह्रदयाची धडधड कशी ऐकू येई मंद
पण तुझा मात्र गोष्ट सांगण्याचा हट्ट
भीती तुला वाटताच मिठी होई घट्ट

दिवसभराच्या दगदगीनंतर थकूनभागून आल्यावर
शीण सारा पळून जाई बाळा तुला पाहिल्यावर
धावत येशी आम्हापाशी हात पुढे तु करून
उचलून घेता तुला जाई उर आनंदाने भरून

खेळताना तु वाटे पावलोपावली धोका
पडताना पाहून चुके काळजाचा ठोका
खेळताना तुला न राही कशाचेच भान
तुला स्वच्छंद हसताना पाहून आम्हा वाटे छान

बघता बघता शिकलास कधी आमचेच शब्द
उजळणी होता त्यांची होऊन जातो निशब्द
कधीकधी बोलतोस तु असं काही पटकन
कौतुकाने डोळ्यामध्ये बाळा पाणी दाटे टचकन

आम्ही न केलेली हौसमौज तुझ्यात रे पाहू
तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र राबू
आयुष्याचा ठेवा म्हणजे तुझ्या आठवणींची साठवण
राहिल ना रे तुला तुझ्या आईबाबांची आठवण?