Thursday, September 10, 2009


…..आवाज तुम्ही ऐकलाय का?


तुमच्या डाव्या हातात सिगरेट अन्
उजव्या हातात ग्लास दारूचा
चाळणी झालेले फुफूस अन्
गुदमरून घाबरलेल्या ह्र्दयाचा
आवाज तुम्ही ऐकलाय का?
पूर्वी तुमच्या शरीरात सळसळणारे रक्त
आता रंग बदलल्याने हळहळते
एक दिवस सिगरेट नाही ओढली तर
तुमच्या कालवणा-या पोटाचा
आवाज तुम्ही ऐकलाय का?
सुखाचा वर्षाव असो वा दुखःचा घाव
तुम्हाला दारू पिण्यासाठी सबबी हव्या असतात
दारू सगळ्या सारख्याच फक्त बाटल्या नव्या असतात
दारूने भुरळ पाडलेल्या मेंदूचा
आवाज तुम्ही ऐकलाय का?
सिगारेटच्या प्रत्येक झुरक्यागणिक
ह्रदयाच्या भिंती जवळ येऊ लागल्या आहेत
पूर्वी प्राणवायू पुरवणा-या ह्या फुफूसाच्या
भूमिका आता वेगवेगळ्या आहेत
अशा धुराचे साम्राज्य बनलेल्या फुफूसाचा
आवाज तुम्ही ऐकलाय का?
तुम्ही तुमच्या जवळ्च्या व्यक्तींनादेखील
काही अंशी धुराचे नजराणे भेट करताय
जवळच्या व्यक्तींपासून लांब जाण्याची
पुरेपुर तयारी तुम्ही थेट करताय

तुम्ही ज्यांच्यासाठी सर्वस्व असलेल्या व्यक्तींचा
आवाज तुम्ही ऐकलाय का?
हे सगळे तुम्ही कुठे ना कुठे वाचले आहे
हे सगळे मेंदूमध्ये कुठे ना कुठे साचले आहे
कळतंय पण वळत नाही अशा विचाराने
निरोगी आयुष्य जगायचे अशा निर्धाराने
तुमच्या चंचल मनाला साद घालून बघा
तिकडून येणारा प्रतिसाद चाचपडून बघा
आणि मग मला न विसरता सांगा
तुमच्या मनाचा आवाज तुम्ही ऐकलाय का?

मित्रा मला तुझी फार काळजी वाटते, त्याच काळजीपोटी पोटतिडकीने ही कविता
लिहीत आहे.

तुमचा कवीमित्र - संतोष
6th August 2009

No comments:

Post a Comment