Wednesday, November 11, 2009


मरणावर बोलू काही?

आयुष्यावर सगळेच बोलतात
दुखाःत बुडतात, आनंदात मोहरतात
पण मरणाचा विषय काढल्यावर
भलेभले देखील घाबरातात


आयुष्यावर साहजिकच जास्त बोलू शकतो
कारण आयुष्याचे आयुष्य मोठे असते
मरणाचा कालावधी तो किती
काळ अन् वेळेची सांगड ती


ब-याच वेळा काळ आलेला असतो पण
वेळेची वेळ झालेली नसते
एरवी सदैव तत्पर असलेल्या यमाच्या
कामात देखील हयगय झालेली असते


आयुष्य हे सर्वतोपरी उपभोगायचे
मरणापूर्वी मात्र भोग भोगायचे
आयुष्याला गरजेची असते ती कामना
मृत्यूला असतात केवळ मरण यातना


आयुष्याला लाभतात ते सुखदुखाःचे क्षण
मरणाची असते ती अंतिम घटिका
आयुष्याचे असते ते तीन अंकी नाटक
मरणाची केवळ लघु एकांकिका


आयुष्याचा शेवट होतो तो मरणाने
ह्या नाहीतर त्या कारणाने
माणूस जगात येतो तो जन्माने
पण ओळखला जातो आपापल्या कर्माने


अनेकांच्या आयुष्यात असेही येतात क्षण
कंटाळून आयुष्याला देवाला मागतात मरण
इथे कळतो जगण्याचा खरा अर्थ
जिथे आयुष्यही जाते मरणाला शरण


आयुष्यभर खरे खोटे बोलल्यावर कळ्ते की
मॄत्यु हे अंतिम सत्य आहे
तुम्हा आम्हांला नवीन असेल
पण यमाला मात्र हे नित्य आहे


जगण्यासाठी करतो आपण दरदिवशी
क्षणोक्षणी एक जीवघेणी धडपड
मेल्यानंतर मात्र केवळ लागते
बांबूची तिरडी अन् पांढरे कापड


जगताना कळत नकळत कुणाकुणावर ओझे टाकतो
मेल्यावर तुमचे ओझे उचलतात ते खांदेकरी
मरणोपरांत तुमच्या आत्म्याला मिळालेल्या
सदगतीचे हेच खरे मानकरी


आयुष्याचा मानवाला लाभलेला अवधी
कुणाचा मोठा तर कुणाचा बारका
जगता जरी आले न एकसारखे
तरी अंत्यविधी मात्र सा-यांचा एकसारखा


लपाछुपीचा खेळ खेळावा असं हे
जीवन मरणाचं क्षणभंगूर नातं
आयुष्यभर नावापुढे लावलेले श्री
क्षणात कैलासवासी होऊन जातं


जगणे हे जर एक प्रवास असेल तर
मरण हे म्हणजे मुक्कामाचे ठिकाण
जगणे हे जर एक शिखर असेल तर
मरण म्हणजे फडकवण्याचे निशाण

2 comments: